शनिवार, ९ मे, २०२०

चकलीची भाजणी.





साहित्य: ३ वाट्या तांदूळ, १ वाटी चणा डाळ, १ वाटी मूग डाळ, १ वाटी उडीद डाळ, पाव वाटी धणे, १ टेबलस्पून जिरे



कृती:
१) सगळ्यात आधी तांदूळ धुवून त्यातलं सगळं पाणी पूर्ण निथळून घ्या.
२) गॅसवर कढई ठेवून त्यात तांदूळ घालून मध्यम आचेवर सतत हलवत तांदूळ भाजा.
३) तांदूळ भाजायला कढईत टाकले की चणा डाळ धुवून, पाणी काढून निथळत ठेवा.
४) तांदूळ संपूर्ण कोरडे होईपर्यंत भाजायचे आहेत. पण त्यांचा रंग बदलता कामा नये. लाल करायचे नाहीत. तांदूळ भाजले गेले हे ओळखण्याची खूण म्हणजे ते धुण्याआधी जसे कोरडे, सळसळीत होते तसेच ते झाले पाहिजेत.
५) तांदूळ भाजून झाले की ताटात काढा आणि चणा डाळ भाजायला टाका.
६) दुसरीकडे मूग डाळ धुवून, पाणी काढून ठेवा. चणा डाळही संपूर्ण कोरडी होईपर्यंत भाजायची आहे पण लाल करायची नाही. चणा डाळ भाजून झाल्यावर ताटात काढा.
७) आता मूग डाळ याचप्रमाणे भाजा.
८) मूग डाळ भाजायला टाकली की उडीद डाळ धुवून ठेवा. नंतर उडीद डाळही याचप्रमाणे भाजून घ्या. सगळी धान्यं नीट भाजली गेली पाहिजेत म्हणजे छान कोरडी झाली पाहिजेत पण त्यांचा रंग बदलता कामा नये.
९) शेवटी धणे-जिरे कोरडेच लाल होईपर्यंत भाजा.
१०) सगळं थंड झालं की एकत्र करा. गिरणीतून दळून आणा. दळताना ज्वारीवर दळायला सांगा.

-kalyani


Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏




कैरी कांद्याची चटणी

 कैरी-कांद्याची चटणी
कैरी-कांद्याची चटणी

साहित्य – २ कै-या (सालासकट मोठे तुकडे करा), १ कांदा (मोठे तुकडे करा), २ टीस्पून लाल तिखट, एका मोठ्या लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी –तेल, मोहरी,हिंग, हळद
कृती –
१) मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे आणि तिखट-मीठ घालून जाडसर वाटून घ्या.
२) नंतर त्यात कैरीचे तुकडे घाला आणि परत जाडसर वाटून घ्या.
३) आता त्यात गूळ घाला आणि परत फिरवा.
४) शेवटी दाण्याचं कूट घालून हलकंसं फिरवा. चटणी बोलमध्ये काढा.
५) लहान कढलीत तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यात जरासा जास्त हिंग घाला. चिमूटभर हळद घाला. फोडणी चटणीवर ओता. कैरीची आंबटगोड चटणी तयार आहे.
ही चटणी तिखट-आंबट-गोड अशी लागायला हवी. त्यामुळे कैरीच्या आंबटपणावर गुळाचं प्रमाण कमीजास्त करा. मुद्दाम एक एक पदार्थ घालत चटणी वाटा. कारण तिचं टेक्श्चर जाडंभरडं असायला हवं आहे.

-kalyani



Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

व्हेज हक्का नूडल्स.

 IMG_4827
साहित्य – २ पाकिटं चिंग्ज सिक्रेट किंवा तत्सम कुठलेही नूडल्स, २ वाट्या कोबी लांब चिरलेला, २ वाट्या बीन स्प्राऊट्स (मोड आलेले, सालं काढलेले मूग, दुकानात मिळतात), प्रत्येकी १ वाटी हिरवी, लाल आणि पिवळी सिमला मिरची (लांब पातळ चिरलेली), २ मोठी गाजरं (जाड किसणीनं किसलेली), १ जुडी कांद्याची पात (कांदा लांब पातळ चिरलेला, पात बारीक चिरलेली), आवडत असल्यास १ पाकिट मश्रूम्स (पातळ स्लाइस केलेले), १ टेबलस्पून सोया सॉस, मीठ-मिरपूड चवीनुसार, २ टेबलस्पून तेल
कृती –
नूडल्स उकडण्याची कृती –
१)  एका मोठ्या पातेल्यात भरपूर पाणी उकळायला ठेवा.
२) पाण्याला खळखळून उकळी आली की त्यात नूडल्स न तोडता घाला. नूडल्स उकळत्या पाण्यात मोकळ्या होतील. जेमतेम ३-४ मिनिटंच शिजवा. नूडल्स अगदी लिबलिबीत शिजवायचे नाहीत. ते थोडे कच्चेच हवेत.
३) हे नूडल्स एका मोठ्या चाळणीत ओता. लगेचच त्यावर फ्रीजमधलं थंडगार पाणी ओता म्हणजे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया बंद होईल.
४) पाणी पूर्ण निथळलं की नूडल्स एका परातीत घ्या. त्यावर २ टीस्पून तेल घाला. आणि हलक्या हातानं तेल नूडल्सला सगळीकडे लावून घ्या. यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत.
IMG_4807
मुख्य कृती –
१) एका मोठ्या पसरट कढईत (या कढईला वोक असं म्हणतात, पण कुठलीही नॉनस्टिक कढई चालेल) तेल गरम करा.
२) त्यात कांदा घालून परता. कांदा लाल करायचा नाही. कांदा जरासा शिजला की त्यात बीन स्प्राऊट्स घाला. अजून एखादं मिनिट शिजवा.
३) आता त्यात सिमला मिरच्या आणि गाजर घाला.  परत जरासं शिजवा आणि नंतर त्यात कोबी घाला.
४) कोबी एखादा मिनिटं शिजला की कांद्याची पात घाला.
५) चांगलं हलवून घ्या आणि त्यात सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घाला.
६) सगळं नीट एकजीव करा आणि त्यात नूडल्स घाला. हलक्या हातानं चांगलं मिक्स करा. दोन मिनिटं हलवत हलवत होऊ द्या. गॅस बंद करा.
हाका नूडल्स तयार आहेत.
ही सगळी कृती मोठ्या आचेवर करायची आहे. भाज्या अर्धवट कच्च्याच ठेवायच्या आहेत. आपल्या आवडीनुसार यात बारीक चिरलेला लसूणही घालू शकता.

-kalyani

Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

मंगळवार, ५ मे, २०२०

उपवासाचे दहा पदार्थ.



1)पंचखाद्य – पंचखाद्य हा खिरापतीचाच एक प्रकार. फक्त सुक्या खोब-याऐवजी यात ओलं खोबरं वापरतात. १ वाटी ओलं खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ, अर्धा टीस्पून जायफळ पूड, प्रत्येकी ४-५ बदाम, काजू तुकडे करून, १०-१२ बेदाणे, थोडी चारोळी, ३-४ केशराच्या काड्या. हे सगळं साहित्य एकत्र करून एका जाड बुडाच्या कढईत घ्या. त्यात १ टीस्पून तूप घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण ठेवून १० मिनिटं मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा. खोबरं शिजलं की पंचखाद्य तयार. यात काही लोक गुळाऐवजी साखर वापरतात. काहीजण थोडी खसखस आणि उडदाची डाळही घालतात. आपल्या आवडीप्रमाणे बदल करा.

2)तळलेले मोदक-- २ वाट्या कणीक, १ टेबलस्पून रवा, २ टीस्पून कडकडीत तापवलेल्या तुपाचं मोहन, चिमूटभर मीठ, चिमूटभर साखर हे सगळं हातानं नीट मिसळून घ्या. लागेल तसं दूध घालून पु-यांना भिजवतो तशी घट्ट कणीक मळून घ्या. अर्धा तास बाजूला ठेवून द्या. सारणाची कृती वर पंचखाद्याची कृती दिली आहे तीच. नंतर पातळ पुरीसारखी पाती लाटा. हातावर घेऊन त्यात मधोमध सारण ठेवा. कडांना हाताच्या चिमटीनं दाबून कळ्या पाडा. त्या सगळ्या कळ्या एकत्रित करून मोदकाचा आकार द्या. असे सगळे मोदक तयार करून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात लाल रंगावर मोदक तळून घ्या.


3)मणगणं--

मणगणं म्हणजे हरभरा डाळ आणि थोडासा साबुदाणा यांची खीर. ही एक गोव्याकडची रेसिपी आहे. हा पदार्थ तिकडे प्रसादाला हमखास केला जातो. थोडीशी पुरणासारखी चव असल्यानं आणि गुळाचा वापर केल्यामुळे हा पदार्थ खमंग लागतो. यासाठी १ वाटी चणा डाळ ३-४ तास भिजवलेली, १ टेबलस्पून साबुदाणा भिजवलेला, पाऊण वाटी किसलेला गूळ, १५-१६ काजू तुकडे करून, जायफळ-वेलची पूड, २ वाट्या नारळाचं दूध. चणा डाळ आणि साबुदाणा एकत्र करून, चणा डाळ अगदी मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्या. शिजवताना वर जो फेस येतो तो वेळोवेळी काढून टाका. डाळ शिजली की गॅस बंद करून ती गरम असतानाच त्यात गूळ घालून विरघळून घ्या. वेलची-जायफळ पूड घाला. थंड होऊ द्या. १ वाटी ओल्या नारळाचा चव दोन वाट्या पाणी घालून मिक्सरला खूप वेळ फिरवा. चांगलं दूध निघायला हवं. नंतर हे दूध गाळणीतून गाळून घ्या. थंड झालेल्या चणाडाळीत हे दूध घाला. त्यात काजूचे तुकडे घाला. गारच खा. किंवा मंद आचेवर जरासं गरम करा. जर नारळाचं दूध फुटू नये असं वाटत असेल तर गरम करताना आधी अर्धा कप साधं दूध घाला. मग नारळाचं दूध घाला. काही लोक यात साधं दूधही वापरतात. आणि चवीला थोडं नारळाचं दूध घालतात. तसंही करता येईल.
4)कणकेचा शिरा – रव्याच्या शि-यापेक्षा कणकेचा शिरा अत्यंत खमंग लागतो. १ वाटी कणीक, पाव वाटी तूप, दीड वाटी दूध, पाऊण वाटी गूळ, सुका मेवा ऐच्छिक. आधी जाड बुडाच्या कढईत कणीक चांगली भाजून घ्या. कणकेचा रंग गुलाबी व्हायला लागला आणि खमंग वास यायला लागला की मग तूप घाला आणि मध्यम आचेवर सतत हलवत कणीक छान लाल होईपर्यंत भाजा. हे फार काळजीपूर्वक करावं लागतं कारण कणीक लगेचच जळू शकते. आता त्यात दूध घाला. चांगलं हलवून घ्या आणि झाकण ठेवून २-३ मिनिटं वाफ येऊ द्या. त्यात गूळ घाला, हवा असल्यास सुका मेवा घाला. चांगलं हलवा. गूळ वितळला की मग परत झाकण ठेवा. २-३ मिनिटं शिजवा. वरून १ टीस्पून तूप घाला. हलवून घ्या आणि गॅस बंद करा.
5)पुरणाचे कडबू:-१ वाटी चणाडाळ चिमूटभर मीठ घालून शिजवून घ्या. शिजली की पाणी वेगळं काढून त्यात वाटीभर गूळ किंवा साखर घालून त्याला गॅसवर शिजवून घ्या. ज्याला पुरणाला चटका देणं म्हणतात. पुरण शिजत आलं की त्यात उलथनं उभं ठेवून बघा. ते जर न पडता स्थिर राहीलं तर पुरण तयार आहे असं समजा. गॅस बंद करा. जरा गरम असतानाच पुरणयंत्रातून काढा. नेहमी पोळ्यांना भिजवतो तशी कणीक भिजवा. त्याची लहान गोल लाटी लाटून घ्या. जराशी जाड लाटा. त्यात आपण करंजीचं सारण भरतो तसं पुरण भरा. करंजीसारखी दुमडून कडांना हातानं दुमड घाला. असे सगळे कडबू तयार करून घ्या. एका नॉनस्टिक तव्यावर किंवा पॅनवर थोडं तूप घाला. कडबू त्यावर लावा. दोन्ही बाजूंनी लागेल तसं तूप घालून खरपूस भाजून घ्या. गरम तूपाबरोबर उत्तम लागतात.

6)रताळ्याचा हलवा किंवा शिरा –अर्धा किलो रताळी घ्या. त्यांची सालं काढून त्याच्या पातळ चकत्या करा. कढईत साजूक तूप घाला. साधारण २ टेबलस्पून पुरे होईल. ते तापलं की त्यावर रताळ्याच्या चकत्या घाला. चांगलं हलवून झाकण ठेवा. जरा वाफ आली की थोडासा दुधाचा हबका मारा. परत झाकण ठेवा. रताळी शिजत आली की त्यात आपल्या आवडीनुसार साखर किंवा गूळ घाला. ते विरघळलं की थोडं ओलं खोबरं आणि जायफळाची पूड घाला. चांगलं मऊ शिजू द्या. किंवा रताळी कुकरला उकडून घ्या. ती सालं काढून मॅश करा. त्यात आपल्या आवडीनुसार थोडं दूध घालून शिजत ठेवा. जरा घट्ट झालं की साखर किंवा गूळ घाला आणि ओलं नारळ आणि जायफळ पूड घाला. गुळानं हलवा जास्त खमंग होतो.

7)खिरापत – सुकं खोबरं मंद आचेवर खरपूस भाजा पण फार रंग बदलू देऊ नका. थोडी खसखस भाजून घ्या. सुकं खोबरं, खसखस, पिठी साखर, वेलची पूड, खडीसाखर, खारकेचे बारीक तुकडे, हव्या असलेल्या सुक्या मेव्याचे तुकडे असं सगळं एकत्र करा. ही खिरापत ७-८ दिवस चांगली राहते.
8)दुधीचा हलवा – दुधी भोपळा सालं काढून किसून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत तूप तापवा. तूप तापलं की त्यावर कीस घाला. चांगलं हलवून झाकण ठेवा. मध्येमध्ये हलवत दुधी चांगला शिजू द्या. अर्धवट शिजत आला की दूध घाला. दूध आटत आलं की त्यात थोडी मिल्क पावडर, साखर, वेलची पूड आणि बदाम, काजूचे काप घाला. झाकण ठेवून मऊ शिजू द्या. वरून थोडं साजूक तूप घाला. मिल्क पावडर वापरायची नसेल तर मग ४-५ पेढे कुस्करून घाला. तसं केलंत तर साखरेचं प्रमाण कमी करा.
9)अननस शिरा – १ वाटी रवा असेल तर एक वाटी टीनमधल्या अननसाचे बारीक तुकडे, हे तुकडे पाकवलेले असतात म्हणून अर्धी वाटी साखर वापरा. तूप गरम करून रवा चांगला खमंग भाजा. नंतर त्यात अडीचपट पाणी घाला. झाकण ठेवून तो चांगला फुलू द्या. मग साखर घाला. साखर विरघळली आणि शिरा चांगला मऊ झाला की त्यात बारीक चिरलेले अननसाचे तुकडे आणि केशर घाला. वरून परत थोडं साजूक तूप घाला. ताजा अननस वापरू नका. कडवट होईल.
10)दलियाची खीर – तयार दलिया किराणा दुकानात मिळतो. तो घ्या. १ वाटी दलिया असेल तर १ लिटर दूध लागेल. दलिया ३-४ तास भिजवून ठेवा. नंतर त्यात १ ते दीड वाटी गूळ आणि वाटीभर ओलं खोबरं घालून कुकरला चांगलं मऊ शिजवून घ्या. शिजवताना पुरेसं पाणी घाला नाहीतर मिश्रण फार घट्ट होतं. हे मिश्रण जरासं कोमट असताना त्यात जायफळ पूड घालून मग हँड मिक्सरनं चांगलं एकजीव करा. किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. थंड झाल्यावर त्यात दूध घाला. दूध घालून उकळू नका. कारण त्यात गूळ वापरलेला आहे. त्यात काजूचे भरपूर तुकडे घाला. फ्रीजमध्ये अगदी मस्त थंड करा.

-KALYANI

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!


पालक पनीर.



साहित्य – ३ जुड्या पालक, २ वाट्या पनीरचे चौकोनी तुकडे, २ कांदे बारीक चिरलेले, १ टोमॅटो बारीक चिरलेला (ऐच्छिक), १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, २ टीस्पून किसलेलं आलं, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ टीस्पून धणे पूड, १ टीस्पून जिरे पूड, २ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट गरम मसाला, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, १टेबलस्पून तेल, थोडं जिरं


भाजीची कृती –
१) पालक स्वच्छ धुवून मोठा मोठा चिरा. एका मोठ्या पातेल्यात पालक आणि अर्धी वाटी पाणी घाला.
२) मोठ्या गॅसवर झाकण ठेवून मधूनमधून हलवत पालक शिजवा. पालक फार काळा होईपर्यंत शिजवू नका.
३) शिजल्यावर पालक त्यातल्या पाण्यासकट थंड करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये पालकाची मऊ पेस्ट करून घ्या.


४) आता एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरं घालून तडतडू द्या. आता त्यात आलं-लसूण-मिरची घाला. चांगलं परतून घ्या.
५) नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला परतायचा आहे पण फार लाल करायचा नाही.
६) कांदा शिजला की त्यात टोमॅटो घालून परता.
७) टोमॅटो शिजला की त्यात तिखट, मीठ, साखर, गरम मसाला, धणे पूड, जिरे पूड घाला.



८) सगळं नीट हलवून घ्या. दोन मिनिटं चांगलं परता. नंतर त्यात पालकाची पेस्ट घाला. चांगलं हलवून घ्या आणि झाकण ठेवा.
९) मंद आचेवर पाच मिनिटं पालक शिजू द्या. पालक आधी शिजलेलाच आहे, त्यामुळे फार जास्त शिजवू नका.
१०) नंतर झाकण काढून त्यात पनीरचे तुकडे घाला. नीट मिसळून घ्या आणि परत झाकण घालून मंद आचेवर ३-४ मिनिटं शिजवा. गॅस बंद करा.

-kalyani


Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!


(मटर पनीर रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)👇
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_8.html?m=1


मिसळ

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

अंडा भजी




साहित्य :

१) दोन अंडी.
२) १ वाटी बेसन.
३) तळण्यासाठी तेल.
४) पीठ भिजवण्यासाठी पाणी.
५) चवीनुसार मीठ.
६) खाण्याचा सोडा.

कृती :

१) दोन अंडी उकडून त्याचे प्रत्येकी दोन तुकडे करावे ,एक वाटी बेसन भजींच्या पिठासारखे भिजवावे.
२) त्यात चवीला मीठ व किंचित खाण्याचा सोडा टाकावा. अंड्याचा एक-एक तुकडा पिठात भिजवून ज्या पद्धतीने भजे तळतात त्याप्रमाणे तेलात तळून घ्यावे .
३) असे सर्व तुकडे तळावेत. चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस सोबत खावे.

-kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

व्हेजिटेबल पुलाव.

                                      (१)



                                     (२)
                           

साहित्य:

१) १ कप बासमती तांदूळ.
२) पावणे दोन कप उकळते पाणी.
३) ३/४ कप मटार.
४) ३/४ कप बारीक चिरलेला गाजर
५) १/४ कप बारीक चिरलेली फरसबी(१ इंचाचे तुकडे)
६) १/२ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
७) २ तिखट हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
८) आलं-लसूण पेस्ट -१ टी स्पून
९) २ माध्याम आकाराचे कांदे-पातळ उभे काप करून
१०)१ छोटा टोमेटो बारीक चिरून
११)चिमुटभर हळद
१२)बिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून
१३) खडा गरम मसाला (२ तमालपत्र,२ वेलची,२लवंग)
१४) ३ टिस्पून तूप
१५)४-५काजु(तुकडे करून)
१६) चवीनुसार मीठ


कृती :

१)तांदूळ धुवून ५ मिनिटे पाण्यात भिजत घालावे.५ मिनिटे झाल्या नंतर तांदुळ जाळीत काढून १०ते१५ मिनिटे तसाच ठेवा.

२)एका खोलगट नॉनस्टिक पातेल्यात तूप गरम करत ठेवावे,तूप गरम झाले कि त्यात खडा गरम मसाला घालून
 ५ ते १० सेकंद परतावे. यांत पातळ उभा चिरलेला कांदा घालावा व चांगला गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा .नंतर टोमेटो व हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे तसेच काजूचे तुकडेही घालून परतून घ्यावेत.

३)आता यांत आलं-लसूण पेस्ट घालावी तसेच सर्व
भाज्या घालाव्यात व ५ ते ७ मिनिटे परतून घ्यावे यातच
निथळलेले तांदुळ घालुन १-२ मिनिटे परतावे.तसेच
बिर्याणी/पुलाव मसाला, हळद घालावी व परतून घ्यावे

४) वरील तांदळात उकळते पाणी, मिठ घालावे आणि
ढवळावे, मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यावी सुरुवातीला
झाकण ठेवू नये.

५) काही मिनिटांत भाताच्या पृष्भागावरील पाणी कमी
होईल. पाणी कमी झाले की आच एकदम मंद करावी झाकण ठेऊन ४ मिनिटे वाफ काढावी.

६)४ मिनिटं झाली की झाकण काढून भात तळापासून ढवळा
 भाताची शिते मोडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
पुन्हा झाकण ठेऊन १५ मिनिटे वाफ काढावी.आच बंद करावी शेवटी बारीक चिरलेली कोथींबीर घालून गरम पुलाव रायत्या बरोबर किंवा टोमॅटो सूप बरोबर सर्व्ह करावा.

टिपः

१)आवडत असल्यास वरून तळलेला कांदा घालू शकता
२)खडा गरम मसाला न घालता पुलाव बनवू शकता
कारण पुलाव खातांना तो अख्खा मसाला अडथळा आणतो पण त्यासाठी बिर्याणी/ पुलाव मसाला जास्त वापरा छानच चव देतो.
३) पुलाव भातात आवडीनुसार भाज्या घालू शकतो.पण
गाजर,मटर, फरसबी असावीच. तसेच एकच भाजी घालुन
सुद्धा पुलाव बनवता येतो.जसे गाजर किंवा फक्त मटर.
४) तुपाचे प्रमाण गरजे नुसार कमी जास्त करावे. तिखट
हिरवी मिरची चे प्रमाण आवडी नुसार कमी जास्त करावे.
५)पुलाव चा रंग पांढरा हवा असेल तर हळद घालु नका तसेच
बिर्याणी /पुलाव मसाला सुध्दा घालु नका त्याऐवजी वरील साहित्यात दिलेले अख्खे मसाले तसेच स्टार फुल,दालचिनी,
हे अख्खे मसाले वापरा.(फोटो क्र.२)

-kalyani



Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏


(पालक कॉर्न पुलाव रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
https://ghrchaswad.blogspot.com/2020/01/blog-post_6.html

भटुरे

साहित्य: १)१ वाटी दही २)२ वाटी मैदा ३)चवीपुरते मीठ ४)तळण्यासाठी तेल कृती: १) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ...