मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

मसाला वांगी

  
     
साहित्य

१) ११ लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी ,दोन उभ्या चिरा देऊन , पूर्ण न कापता, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावीत जेणेकरून काळी पडणार नाहीत

२)३ कांदे (१ बारीक चिरलेला, २ भाजून)

३) २मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले

४)१ टीस्पून मोहरी

५)१ टीस्पून जिरे

६)पाव टीस्पून हिंग

७)१ टीस्पून हळद

८)मीठ चवीप्रमाणे

९)१० -१२ कढीपत्ता पान

१०)३ ते ४ टेबलस्पून तेल 

११)अर्धी वाटी खोबरं

१२)५ टेबलस्पून शेंगदाणे

१३)पाव कप कोथिंबीर बारीक चिरून

१४)२ हिरव्या मिरच्या

१५)१ इंच आल्याचा तुकडा

१६)१०-१२ लसणीच्या पाकळ्या

१७)२ टीस्पून लाल मसाला(जो आपण रोजच्या भाज्यांमध्ये वापरतो)

१८)१ टीस्पून धणे पावडर

१९) गरम मसाला

कृती:

१)सर्वप्रथम वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घ्या. 

२)शेंगदाणे, खोबरं, २ कांदे मध्यम आचेवर करड्या रंगावर खरपूस भाजून घ्या.

३)एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, खोबरं,कांदा, हिरव्या मिरच्या , आले, लसूण आणि कोथिंबीर ( कोवळ्या देठांसकट घालावी , छान सुगंध येतो मसाल्याला ) घालून ,पाव कप पाणी वापरून बारीक दाटसर मसाला वाटून घ्यावा.

४) वाटलेला मसाला एका मोठ्या वाडग्यात काढून घ्यावा. त्यात धणे पावडर, लाल मसाला,गरम मसाला चवीप्रमाणे मीठ घालावे आणि छानपैकी एकत्र करून घ्यावे. हा मसाला आपल्याला वांग्यात भरायचा आहे. वांगी मिठाच्या पाण्यातून बाहेर काढावी . वांगी देठासकट ठेवावीत , चविष्ट लागतात . मसाला वांग्यांत दाबून भरावा , परंतु वांग्याचे तुकडे पडू देऊ नयेत . सारी वांगी भरून झाली की उरलेला मसाला आपण वांग्याच्या रश्श्यात घालू.


५)एका कढईत ३ ते ४ टेबलस्पून तेल गरम करावे . गरम तेलात मोहरी, जिरे , हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा . साधारण २ ते ३मिनिटांत कांदा मऊ होतो. आता टोमॅटो घालून घ्या.

 ६)हळद व थोडे मीठ घालावे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतात. मीठ घालताना जपून घालावे कारण आपण वांग्याच्या मसाल्यात देखील मीठ घातले आहे. झाकण घालून मंद आचेवर टोमॅटो शिजू द्यावेत.
साधारण ६ मिनिटे झाकून शिजवल्यावर टोमॅटो मऊ होतात. 

७)आता भरलेली वांगी घालून मिसळून घ्यावीत.मिसळताना वाटण वांग्या बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी.मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून ते पाणी कढईत घालावे(भांडे स्वच्छ होईल वाटण सुद्धा वाया जाणार नाही 😀)मंद आचेवर झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजू द्यावीत. झाकणावर पाणी ठेवावे म्हणजे वांगी करपणार नाहीत.

८)वांगी थोडी शिजून मऊ होतात आणि पाणी ही सुटते. आता उरलेला मसाला घालावा ,नीट एकत्र करून घ्यावा.
साधारण दीड कप गरम पाणी घालून रस्सा तयार करावा.आपल्याला हवा तास पातळ किंवा घट्ट रस्सा ठेवावा. 

९)१० मिनिटांनंतर वांगी शिजली आहेत की नाही हे पाहावे. सारी वांगी शिजली नसतील तर परत झाकण घालून अजून ५ मिनिटे शिजू द्यावीत.

टीपा:
१) रस्सा कमी हवा असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे.
२) शेंगदाणे भाजताना काळजी घ्यावी करपू देऊ नयेत
३) तिखट जास्त आवडत असल्यास लाल मसाल्याचे प्रमाण वाढवावे.

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटुरे

साहित्य: १)१ वाटी दही २)२ वाटी मैदा ३)चवीपुरते मीठ ४)तळण्यासाठी तेल कृती: १) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ...