रविवार, १७ जानेवारी, २०२१

भटुरे



साहित्य:

१)१ वाटी दही
२)२ वाटी मैदा
३)चवीपुरते मीठ
४)तळण्यासाठी तेल

कृती:

१) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ भिजवावे. दही आणि मीठ एकत्र केल्याने दह्याला किंचित पाणी सुटते त्यामुळे १-२ चमचे मैदा अधिक लागू शकतो. थोडे तेल घालावे. पिठ मळून घ्यावे. पिठ ४-५ तास झाकून ठेवून द्यावे.
२) ४-५ तासांनंतर परत एकदा पिठ मळून घ्यावे. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करावे (२ ते अडीच इंच आकाराचे). तेल तापत ठेवावे. पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पुर्या लाटाव्यात. खुप पातळ लाटू नये.
३) हे भटूरे तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. छोल्यांबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.


--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏


छोले


साहित्य:

१)१ कप पांढरे काबुली चणे.
२)२ कांदे
३)२ लालबुंद टोमॅटो
४)दिड टिस्पून छोले मसाला
५)४ हिरव्या मिरच्या (पेस्ट करून)
६) गरम मसाला

फोडणीसाठी:
१)१/२ टिस्पून जिरे
२)१/४ टिस्पून हळद
३)२ टिस्पून लाल तिखट
४)१ टिस्पून आले पेस्ट
५)५ लसूण पाकळ्यांची पेस्ट
६)१ टिस्पून आमचूर पावडर
७)१ टिस्पून धणेपूड
८)२-३ टिस्पून तेल
९)कोथिंबीर
१०)लिंबू
११)मीठ

कृती :

१) चणे ९-१० तास भिजत घालावे. नंतर कूकरमध्ये ४ शिट्या करून चणे शिजवून घ्यावे, शिजवताना पाण्यात थोडे मिठ घालावे. चणे मऊसर शिजवावे. अगदी जास्त शिट्ट्या केल्या तर चणे फुटतात. त्यामुळे प्रत्येकाने घरातील कूकरचा अंदाज घेउन चणे शिजवावेत.

२) कांदा, टोमॅटो भाजावे व पेेेस्ट करून घ्या.
  (पेस्ट एकत्र करू नये कांद्याची वेगळी व टोमॅटोची       वेगळी करावी)

३) चणे शिजले कि कढईत २-३ टिस्पून तेल गरम करावे. जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून परतावे, कांदा पेेेस्ट तेल सुटेपर्यंत परतावी.कांदा पेस्ट व्यवस्थित परतली की,टोमॅटो पेस्ट टाकावी. तेल सुटे पर्यंत परतावी.धणेपूड,गरम मसाला घालावा.मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे.

४) वरील ग्रेव्ही पाच ते सात मिनिटे व्यवस्थित कि शिजलेले चणे घालावेत,चवीपुरते मीठ घालावे म्हणजे चणे शिजताना मीठ आत मुरते.आवश्यक तेवढे पाणी घालावे.मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.

५) २-३ मिनीटांनी छोले मसाला आणि आमचूर पावडर घालून ढवळावे.जर मीठ किंवा तिखट कमी वाटत असेल तर वरून घालावे.थोडावेळ मंद आचेवर उकळू द्यावे.

छोले आणि भटुरे यांचे काँबिनेशन मस्तच लागते. तसेच छोले, पाव , चपाती,घवण सोबत खायला छान लागतात.



--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

मसाला वांगी

  
     
साहित्य

१) ११ लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी ,दोन उभ्या चिरा देऊन , पूर्ण न कापता, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावीत जेणेकरून काळी पडणार नाहीत

२)३ कांदे (१ बारीक चिरलेला, २ भाजून)

३) २मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले

४)१ टीस्पून मोहरी

५)१ टीस्पून जिरे

६)पाव टीस्पून हिंग

७)१ टीस्पून हळद

८)मीठ चवीप्रमाणे

९)१० -१२ कढीपत्ता पान

१०)३ ते ४ टेबलस्पून तेल 

११)अर्धी वाटी खोबरं

१२)५ टेबलस्पून शेंगदाणे

१३)पाव कप कोथिंबीर बारीक चिरून

१४)२ हिरव्या मिरच्या

१५)१ इंच आल्याचा तुकडा

१६)१०-१२ लसणीच्या पाकळ्या

१७)२ टीस्पून लाल मसाला(जो आपण रोजच्या भाज्यांमध्ये वापरतो)

१८)१ टीस्पून धणे पावडर

१९) गरम मसाला

कृती:

१)सर्वप्रथम वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घ्या. 

२)शेंगदाणे, खोबरं, २ कांदे मध्यम आचेवर करड्या रंगावर खरपूस भाजून घ्या.

३)एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, खोबरं,कांदा, हिरव्या मिरच्या , आले, लसूण आणि कोथिंबीर ( कोवळ्या देठांसकट घालावी , छान सुगंध येतो मसाल्याला ) घालून ,पाव कप पाणी वापरून बारीक दाटसर मसाला वाटून घ्यावा.

४) वाटलेला मसाला एका मोठ्या वाडग्यात काढून घ्यावा. त्यात धणे पावडर, लाल मसाला,गरम मसाला चवीप्रमाणे मीठ घालावे आणि छानपैकी एकत्र करून घ्यावे. हा मसाला आपल्याला वांग्यात भरायचा आहे. वांगी मिठाच्या पाण्यातून बाहेर काढावी . वांगी देठासकट ठेवावीत , चविष्ट लागतात . मसाला वांग्यांत दाबून भरावा , परंतु वांग्याचे तुकडे पडू देऊ नयेत . सारी वांगी भरून झाली की उरलेला मसाला आपण वांग्याच्या रश्श्यात घालू.


५)एका कढईत ३ ते ४ टेबलस्पून तेल गरम करावे . गरम तेलात मोहरी, जिरे , हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा . साधारण २ ते ३मिनिटांत कांदा मऊ होतो. आता टोमॅटो घालून घ्या.

 ६)हळद व थोडे मीठ घालावे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतात. मीठ घालताना जपून घालावे कारण आपण वांग्याच्या मसाल्यात देखील मीठ घातले आहे. झाकण घालून मंद आचेवर टोमॅटो शिजू द्यावेत.
साधारण ६ मिनिटे झाकून शिजवल्यावर टोमॅटो मऊ होतात. 

७)आता भरलेली वांगी घालून मिसळून घ्यावीत.मिसळताना वाटण वांग्या बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी.मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून ते पाणी कढईत घालावे(भांडे स्वच्छ होईल वाटण सुद्धा वाया जाणार नाही 😀)मंद आचेवर झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजू द्यावीत. झाकणावर पाणी ठेवावे म्हणजे वांगी करपणार नाहीत.

८)वांगी थोडी शिजून मऊ होतात आणि पाणी ही सुटते. आता उरलेला मसाला घालावा ,नीट एकत्र करून घ्यावा.
साधारण दीड कप गरम पाणी घालून रस्सा तयार करावा.आपल्याला हवा तास पातळ किंवा घट्ट रस्सा ठेवावा. 

९)१० मिनिटांनंतर वांगी शिजली आहेत की नाही हे पाहावे. सारी वांगी शिजली नसतील तर परत झाकण घालून अजून ५ मिनिटे शिजू द्यावीत.

टीपा:
१) रस्सा कमी हवा असल्यास पाण्याचे प्रमाण कमी करावे.
२) शेंगदाणे भाजताना काळजी घ्यावी करपू देऊ नयेत
३) तिखट जास्त आवडत असल्यास लाल मसाल्याचे प्रमाण वाढवावे.

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

शाही पुलाव



  साहित्य:

1. २ वाटी बासमती तांदूळ
2. १०० ग्रॅम पनीर
3. १ वाटी मटार
4. १ गाजर
5. ३ कांदे
6. ४-६ पाकळ्या लसूण
7. १ तुकडा आले
8. २ हिरव्या मिरच्या
9. १/२ वाटी अननस चिरलेला
10. १ मोठा चमचा काजू
11. १ मोठा चमचा बेदाणे
12. १ चमचा जीरे
13. ४ लवंग,३ तमालपत्र
14. ३ हिरवी वेलची
15. २ तुकडे दालचिनी
16. ६ आख्खी काळी मिरी
17. मीठ चवीप्रमाणे
18. १/४ चमचा केशर
19. ६ चमचे तूप

कृती:

तांदूळ धुऊन दहा मिनिटे पाण्यात भिजवा. त्यानंतर तांदूळ पाण्यातून काढून पाच मिनिटे निथळत ठेवा पातेल्यात चार वाट्या पाणी टाकून गॅसवर ठेवा. जी वाटी तांदूळ घेण्यासाठी वापरली होती ,तीच वाटी पाणी घेण्यासाठी वापरा.भिजवलेले तांदूळ पाणी काढून गॅसवरील पातेल्यात शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. गाजर सोलून चिरुन घ्या. मटारचे दाणे काढा. कांदा-लसूण व आले सोलून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा. केशर २ चमचे पाण्यात भिजवा. एका कढईत तूप गरम करून काजू तळून घ्या. त्याच कढईत जिर्‍याची फोडणी देऊन कांदा परतून घ्या. नंतर लवंग, हिरवी वेलची, दालचिनी व काळी मिरी वाटून टाका. आता आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परता. पेस्ट चांगली परतल्यावर मटार, गाजर, पनीर, अननस, काजू, बेदाणे व चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा. दोन मिनीटे परतून शिजलेले तांदूळ व केशर टाकून नीट एकत्र करा, गॅस बंद करून गरमा-गरम वाढा.


टीपा:

१) आपल्या आवडीनुसार आपण पुलाव चा रंग ठेवू शकतो. पिवळा रंग हवा असल्यास हळदीचा वापर करावा.
२) अननसआवडत नसल्यास नाही वापरला तरी चालेल.
३) टोमॅटो आवडत असल्यास अर्धा टोमॅटोचा वापर करावा. आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून झाल्यावर टोमॅटो अर्धा चिरून टाकावा. आपल्या आवडीनुसार भाज्या टाकाव्या जसे की फ्लावर, फरसबी.
४) बासमती तांदूळ न वापरता शाही पुलाव बनवता येतो परंतु तांदूळ जुने.व आकाराने लहान असावेत.
५) तिखट जास्त आवडत असल्यास मिरच्यांचे प्रमाण वाढवावे.
६) वरील फोटोमध्ये शाही पुलाव बनवताना साध्या तांदळाचा वापर केला आहे.

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

स्वयंपाक विषयक सल्ले

1)कुठलाही रवा (अगदी बाजारातून आणलेला इडली रवा का असेना) बाजारातून आणल्यावर भाजून आणी रूम टेंपरेचरला आणून मग बरणीत किंवा डब्यामध्ये भरावा.
असे केल्याने कुठलाही रव्यास अळी लागत नाही. आणी उपमा किंवा शीरा करताना रवा भाजण्यासाठी लागणारा वेळ वाचतो(सकाळी घाईच्या वेळी)
इडली रवा भाजून मग इडली साठी वापरला तरं इडली हलकी होते

2)साबुदाणा आणल्यानंतर कोरडा भाजून, रूम टेंपरेचरला आल्यानंतर बरणीत किंवा डब्यामध्ये भरावा.
भाजून घेतल्याने साबुदाण्यातील स्टार्च कमी होते आणी खिचडी मोकळी होते.
तसेच पचायलाही खिचडी हलकी होते.

3)शेंगदाणे भाजताना, शेंगदाण्याला मिठाचे पाणी लावावे (अगदी शेंगदाणे पुर्णपणे ओलसर होतील, इतके) आणी अर्धातास झाकून ठेवावेत. आणी मग ते शेंगदाणे शक्यतो लोखंडी कढईत मंद गँसवर भाजावेत.( असे केल्याने शेंगदाणे भट्टीत भाजल्या सारखे,भाजले जातात आणी दाण्याचे कूट लवकर खवटं होतं नाही.

4)लोण्यासाठी साठवली जाणारी मलई नेहमी फ्रिजरमध्ये ठेवावी. म्हणजे ती कडसर होतं नाही.

5)लोणी कढवताना, तीन,चार वेळा लोणी थंड पाण्यानी धुवून घेतले की तूप लवकर खराब होत नाही (म्हणजे तुपाचा खमंगपणा खूप दिवस ताज्या केलेल्या तुपासारखाच राहतो)
तूप करताना त्यामध्ये चिमुटभर मीठ,हळदीच पानं किंवा विड्याच पानं घालावं(ह्यामुळे तूप रवाळ होतं आणी बेरी खाली बसते)

6)गुळपोळीसाठी गुळ डायरेक्ट पातळ करून घेण्यापेक्षा, कुकर मध्ये, घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये गूळ आणी थोडेसे तेल घालून,कुकरच्या तीन शिट्या काढणे.(असे केल्याने गूळ, लोण्यासारखे मुलायम होते आणी पोळीच्या काठापर्यंत व्यवस्थीत सरकते). गूळपोळी करीता बेसन भाजण्या करीता देखील तेलंच वापरावे.(तूप थंड झाल्यावर थिजतं आणी मग पिठाच्या किंवा सारणाच्या गुठळ्या होतात). गुळपोळीच्या वरील आवरण असणार्या पिठामध्ये गव्हाच्या पिठाबरोबर थोडे बेसनही मिक्स करावे ( असे केल्याने सारणातील गूळ बाहेर पडतं नाही. हे प्रमाण चार वाटी गव्हाचे पीठ असेल तरं मूठभर बेसन, असे असावे)

7)तीळ,खसखस नेहमी कोरडे भाजून साठवावेत (नाहितर ह्या पदार्थाना लवकर अळी लागते)

8)वेलची नेहमी मिरी बरोबर ठेवावी(म्हणजे वेलची खराब होत नाही. आणी सुगंधही कमी होतं नाही)

9)हींग,सुखे खोबरे नेहमी तुरडाळीमध्ये ठेवावे

10)किसलेले ओले खोबरे नेहमी फ्रिजरमध्ये ठेवावे.
नाँर्मल फ्रीजमध्ये किसलेले खोबरे लवकर खराब होतं

11) फ्रीज मधील भाज्यांची साठवणूकही तेवढीच महत्वाची असते. बाजारातून भाजी आणल्यानंतर, ती भाजी तशीच फ्रीजमध्ये नकोंबता व्यवस्थीत साठवल्या तरं त्या भाज्या पंधरा ते बावीस दिवस चांगल्या राहतात. आणी त्या भाज्या वापरताना खराब होणार्या भाज्या आधी वापराव्यात आणी टिकावू भाज्या त्यानंतर वापराव्यात.
भाजी साठवण्याच्या पध्दती -
A) पाले भाज्या सोडून इतरं भाज्या कोरड्या कपड्यांनी पुसून घेणे. मग त्या भाज्या पेपरमध्ये पँक करून सुती जाळीदार कपड्याच्या पिशव्यांमध्ये भराव्यात आणी मग फ्रीजमध्ये साठवाव्यात
(हे करण्याआधी भाजीचा टाकावू भाग आधी काढून घेणे. उदा- मिरचीचे देठ काढून घेणे,फ्लाँवरचे देठ काढून घेणे)

B) पाले भाज्या निवडून घेणे मग कोरड्या कपड्यानी,हलक्या हातानी पुसून घेवून मग पेपरमध्ये रँप करून मग सुती जाळीदार कपड्याच्या पिशवीत साठवणे. आणी ज्या भाज्या आपण आमटीत घालणार आहोत, अशा भाज्या जरास्या तेलामध्ये परतून मग नाँर्मल झाल्याकी डब्यामध्ये भरून ठेवल्याकी वापरायच्या वेळी, वेळही वाचतो आणी तेलात परतल्याने भाजीचा रंग आणी स्वाद कायम राहतो(तेलानी भाजीला ग्रिसींग होते)

C) कोथिंबीर,आले आणी कडिपत्ता निवडून घेवून मग कोरडे झाल्यावर, पेपरमध्ये गुंडाळून प्लँस्टीकच्या कटेंनरमध्ये ठेवल्यास, ह्या गोष्टी महिनाभर चांगल्या राहतात

12)तूरडाळ शिजवण्याआधी कमीत कमी अर्धातास आधी भिजवून घेतली आणी मग शिजवली तरं डाळ एकदम मऊ
शिजते आणी आमटी एकसंध होते.

13) तुप संपलेली बाटली किंवा डबा साफ करण्याआधी त्यामध्ये गरम पाणी किंवा शिजलेली डाळ घालून घेणे आणी मग आमटी करणे.(असे केल्याने बाटलीला लागलेले तूपही वाया जात नाही आणी बाटली साफ करताना त्रासही होतं नाही)

13)दोन,तीन कोरड्या चटणी,मुरांबा घरामध्ये नेहमी असावे(कधी ऐनवेळी एक दोन माणसं जेवण करण्या करिता वाढली तरं किंवा भाजी कमी असेल तरं अशा गोष्टी कामी येतात)

14)मेतकूट,डांगर हे ही प्रकार ऐनवेळी गरज भागावण्या करिता गृहिणीचे सहकारी ठरतात.

15)दही,ताक नेहमी घरी असावे.

16) चिरलेली भेंडी आणी उकडून सोलून घेतलेले बटाटे कमीत कमी अर्धातास फ्रीजमध्ये ठेवून मग भाजी करावी.भेंडीची भाजी कुरकुरीत होते आणी बटाट्याच्या फोडी करताना बटाटा सुरीला चिकटत नाही.

17)कुठलिही स्टप पोळी किंवा पराठा करताना भरले जाणारे सारण आणी वरील आवरण असणारे पीठ, यांचा घट्टपणा किंवा सैलपणा एक सारखाच असायला हवा.(म्हणजे सारण बाहेर पडतं नाही आणी पोळीच्या काठापर्यंत सरकते)

18)पोहे,उपमा,शिरा ,खिचडी असे पदर्थ नेहमी खोलगट कढईत करावेत.(असे केल्याने, वाफ देताना पदार्थावर व्यवस्थीत दाब पडतो. आणी अशा दाबाने पदार्थाला चांगली वाफ मिळते आणी पदार्थ फुलतो आणी हलका होतो)

19)बेसन लाडू करताना त्यामध्ये थोडेसे तळून घेतलेल्या पोह्याची पावडर घातली तरं लाडू टाळ्याला चिकटत नाही

20)अनारसे,कडबोळी,
शंकरपाळे तळल्यावर, कोरड्या पोह्यावर पसरावेत.(पोहे जास्तीचे तेल शोषून घेतात) मग हे पोहे तळून चिवडा करता येतो.

अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या एक गृहिणी म्हणून पदभार संभाळल्यानंतर कधी अनुभवानी, तरं कधी उपाय म्हणून राबवून आत्मसात होतील 

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

वऱ्याचा शिरा.(उपवासाचा शिरा)



साहित्य :

1. १ वाटी वरी तांदुळ
2. २चमचे साजुक तूप
3. पाऊण वाटी साखर
4. २ वाटी पाणी
5. दीड वाटी दूध
6. ७काजू ,७बदाम
7. केशर १ कांडी
8. २ वेलची

कृती :

१)प्रथम एका पातेल्यात साखर, दूध, केशर व पाणी एकत्र करून उकळवून घ्यावे..
२)एका बाजुला कढईत १ चमचा तुपावर वरी तांदुळ भाजा
३) उकळते मिश्रण भजलेल्या तांदुळ वर ओतावे.ढवळुन घ्यावे.आता त्यात काजू बदाम आणि वेलची पूड घालावी.
१ चमचा तूप घालावे
४ )पुन्हा  ढवळुन घ्यावे.आता त्यावर झाकण ठेवून
मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे.. शिरा तयार..

टिपः

१) तांदुळ भाजताना मंद आचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्यावे
२) साजुक तूप उपलब्ध नसेल तर डालडा (वनस्पती तूप)
   वापरले तरी चालेल.

-kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

रविवार, १० मे, २०२०

डाळ वडा.


साहित्य:
१ कप चणाडाळ
५ ते ६ हिरव्या मिरच्या
८ ते १० लसूण पाकळ्या
१ इंच आले
१० ते १५ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून हळद
१ टिस्पून जीरे
१ टिस्पून तीळ
१/२ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ कप तेल तळण्यासाठी
चवीपुरते मिठ



कृती:
१) चणा डाळ धुवून घ्यावी. नंतर २ ते ३ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावे. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निघून जाईल.
२) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आले लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जीरे घालून मिक्स करावे.
४) कढईत तेल गरम करावे. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून जाडसर वडा थापावा. गरम तेलात मध्यम आचेवर तळून काढावा.
गरम गरम वडा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचेच्या आंबटगोड चटणीबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) वड्याच्या मिश्रणात १ कांदा बारीक चिरून घातल्यास जरा वेगळा पण छान स्वाद येतो.




-kalyani


Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

पाव भाजी.





साहित्य:
१२  ते १५ पाव (लादीपाव)
दीड कप बारीक चिरलेला कांदा
२  ते अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो
६ मध्यम बटाटे (अंदाजे अर्धा किलो)
१२-१५ वाफवलेले फ्लॉवरचे छोटे तुरे
१/२ कप वाफवलेले मटार
३/४ ते १ कप सिमला मिरची, बारीक चिरून
८ ते १० लसूण पाकळ्या (१ टेस्पून लसूण पेस्ट)
१ टिस्पून लाल तिखट
४ टेस्पून तेल (किंवा २ टेस्पून बटर + ३ टेस्पून तेल) 
१/२ टिस्पून जिरे (ऐच्छिक)
२ टेस्पून पावभाजी मसाला
चवीनुसार मीठ
सर्व्ह करताना बटर, लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर

कृती :
१) चिरलेल्या आणि वाफवलेल्या भाज्या तयार ठेवाव्यात.
२) लसूण सोलून त्यात लाल तिखट घालावे. १ मोठा चमचा पाणी घालून मिकसरवर बारीक करावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे, लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट घालावी.लसूण परतले गेल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. मध्यम आचेवर तो शिजू द्यावा. नंतर त्यात चिरलेली सिमला मिरची घालावी.
४) २-३ मिनिटानंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालावे. टोमॅटो नरम झाले की बटाटा, फ्लॉवर आणि मटार घालावे. ढवळून त्यात पावभाजी मसाला घालावा. थोडे पाणी घालावे.पावभाजी कढईच्या तळाला लागू नये म्हणून मधेमधे ढवळत राहावे. चांगले मॅश करावे.
५) नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवून वाफ काढावी. चवीनुसार मीठ घालावे. वाढताना बटर घालावे. वरुन लिंबू पिळावे आणि कोथिंबीर पेरावी.

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏

उपवासाची बटाटा उसळ





वेळ:  
२० मिनिटे 
 व्यक्तींसाठी.

साहित्य :

- उकडलेले बटाटे 
) - हिरव्या मिरच्या
/ वाटी शेंगदाणा कूट 

- कढीपत्त्याची पाने 

/ छोटा चमचा जीरे  

कोथिंबीर बारीक चिरून 

ओल खोबर 

 छोटा चमचा साखर  

तेल फोडणीसाठी 

१०मीठ चवीनुसार

कृती:
प्रथम एका भांडयात तेल गरम करून त्यात जीरे,
कढीपत्ता  बारिक  चिरलेली हिरवी मिरची 
घालावी.

शेंगदाण्याच कूट घालून  मिनिटे परतावे.
उकडून घेतलेले बटाटे सोलून त्यांच्या बारिक फोडी करून त्या वरच्या फोडणीवर घालून चांगले
परतून घ्यावे. मीठ घालून
परतावे झाकण ठेवून  मिनिटे मंद गॅसवर
उसळ होऊ द्यावी साखरखोबरे  कोथिंबीर घालून खावयास घ्यावी 
खोबर आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल

--kalyani

Dear readers,
Thanks for visiting 'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com

तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा! 🙏

शनिवार, ९ मे, २०२०

मिक्स्ड व्हेजिटेबल्स विथ ग्रेव्ही

IMG_4819
साहित्य – दीड वाटी फ्लॉवर (मोठे तुरे काढलेला), दीड वाटी ब्रोकोली (मोठे तुरे काढलेला), दीड वाटी गाजर (मोठे तुकडे केलेलं), दीड वाटी झुकिनी (मोठे तुकडे केलेले), दीड वाटी बेबी कॉर्न (तिरपे मोठे तुकडे केलेले), दीड वाटी पनीर किंवा टोफू (चौकोनी तुकडे केलेले), १ वाटी फरसबी (लांब तिरपी चिरलेली), १ वाटी सिमला मिरची (चौकोनी मोठे तुकडे केलेली),  ३-४ सुक्या लाल मिरच्या, १ टेबलस्पून लसूण अगदी बारीक चिरलेला, २ टीस्पून आलं किसलेलं, २ टेबलस्पून सोया सॉस, २ टीस्पून चिली सॉस, २ टीस्पून व्हाईट व्हिनेगर (ऐच्छिक), ३ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर (१ कप पाण्यात मिसळून ठेवा) १ टीस्पून साखर, मीठ-मिरपूड चवीनुसार, १ टेबलस्पून तेल
कृती –
१)  एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात फरसबी आणि गाजर घाला. ३-४ मिनिटं शिजवा.
२) आता त्यात फ्लॉवर आणि ब्रोकोलीची तुरे घाला. फरसबी शिजत आली की गॅस बंद करा, तेवढ्या वेळात बाकीच्या भाज्या शिजतात.
३) उकडलेल्या भाज्या एका चाळणीत निथळून ठेवा. भाज्या अर्धवट कच्च्या असल्या पाहिजेत.
४) दुस-या लहान पातेल्यात पाणी घालून बेबी कॉर्न शिजवून घ्या. तेही चाळणीत निथळून ठेवा.
५) एका मोठ्या कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झालं की लाल मिरच्या आणि लसूण घाला.
६) लसूण परतला की त्यात आलं घाला. परतून घ्या आणि त्यात झुकिनी आणि सिमला मिरची घाला.
७) एखादं मिनिट परता आणि त्यात उकडलेल्या भाज्या घाला. चांगलं मिसळून घ्या आणि त्यात सोया सॉस, चिली सॉस, मीठ, मिरपूड, साखर, व्हिनेगर घाला. परत चांगलं हलवा.
८) आता त्यात पनीर किंवा टोफूचे तुकडे घाला. परत चांगलं हलवा आणि दीड कप गरम पाणी घाला.
९) उकळी आली की त्यात पाण्यात कालवलेलं कॉर्न फ्लोअर घाला. हलवत रहा. कॉर्न फ्लोअर लगेचच घट्ट होईल.
१०)  ग्रेव्ही फार घट्ट वाटली तर थोडं पाणी घाला. झाकण ठेवून एक उकळी काढा. गॅस बंद करा.
मिक्स व्हेजिटेबल्स इन ग्रेव्ही तयार आहे. ही भाजी जराशी तिखटच चांगली लागते. तेव्हा आपल्या आवडीनुसार चिली सॉस, मिरपूडीचं प्रमाण वाढवा.


--kalyani

Dear readers,
Thanks for visiting'Ghrchaswad'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me personally at
shelarkalyani05@gmail.com


तुमच्या प्रतिक्रया नक्की कळवा!🙏


(व्हेज हक्का नुडल्स रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा)👇
https://ghrchaswad.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भटुरे

साहित्य: १)१ वाटी दही २)२ वाटी मैदा ३)चवीपुरते मीठ ४)तळण्यासाठी तेल कृती: १) दही आणि मीठ एकत्र करून घोटावे. त्यात मैदा घालून पिठ...